
छत्रपती संभाजीनगर, 03 एप्रिल, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत विषय समिती सभापतिपदांच्या निवडणुकीत मीनाक्षी पवार, अनिता मोठे, बालाजी सोनटक्के आणि सचिन गरड यांची बिनविरोध निवड झाली असून भाजपने आपले राजकीय वर्चस्व अधिक अधोरेखित केले. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर ही महत्त्वाची राजकीय लढत मानली जात होती. सुरवातीपासून आखलेल्या रणनीतीमुळे विरोधकांना कोंडीत पकडण्यात भाजपला यश आले. परिणामी, विरोधकांकडून उमेदवारी अर्जच दाखल झाला नाही आणि भाजपने चारही विषय समित्यांवर नियंत्रण मिळवले.
कन्नडचे उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या विशेष सभेत ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली.
एकूण ३१ सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रक्रियेत भाजपने आपली बहुमताची ताकद दाखवून दिली. मीनाक्षी पवार आणि अनिता मोटे या भाजपच्या उमेदवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे बालाजी सोनटक्के आणि भाजप पुरस्कृत अपक्ष सचिन गरड यांची बिनविरोध निवड झाली. नुकतीच प्रशासकीय राजवट संपल्यानंतर जिल्हा परिषदेत ही पहिली मोठी राजकीय चाचणी होती. या चाचणीत भाजपने अपक्ष सदस्यांना सोबत घेत आपले संख्याबळ अधिक बळकट केले. त्यामुळे विरोधकांना प्रभावी लढत देता आली नाही. त्यामुळे भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचे दिसून आले.
निवडणुकीत विरोधकांनी सुरवातीला
रस दाखवला होता. महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील डोणगावकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून वरुण पाथ्रीकर यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केले होते. मात्र, अंतिम क्षणी अर्ज दाखल न केल्याने त्यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले. या माघारीमुळे भाजपचा मार्ग मोकळा झाला.
संभाव्य खातेवाटपानुसार मीनाक्षी पवार यांच्याकडे महिला व बालकल्याण विभाग, बालाजी सोनटक्के यांच्याकडे समाजकल्याण विभाग दिला जाण्याची शक्यता आहे. अनिता मोठे यांच्याकडे आरोग्य व शिक्षण आणि सचिन गरड यांच्याकडे अर्थ व बांधकाम विभागाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
सध्याच्या पक्षीय बलाबलावर नजर टाकल्यास जिल्हा परिषदेत भाजप २३ सदस्यांसह आघाडीवर आहे. शिवसेना २१, शिवसेना यूबीटी नऊ, राष्ट्रवादी काँग्रेस चार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एक, प्रहार एक आणि इतर तीन सदस्य आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis