मुंबई महापालिका शाळांत ‘मनाचे श्लोक’ सक्तीवरून नवा वाद; प्रस्तावाला मनसेचा पाठिंबा, एमआयएमचा विरोध
मुंबई, 03 एप्रिल (हिं.स.)। मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ‘मनाचे श्लोक’ सक्तीने शिकवण्याचा प्रस्ताव शिवसेना (ठाकरे गट)च्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडल्याने शहरात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रस्तावाला मनसेकडून पाठिंबा मिळ
New Controversy Over Mandatory Manache Shlok BMC Schools


मुंबई, 03 एप्रिल (हिं.स.)। मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ‘मनाचे श्लोक’ सक्तीने शिकवण्याचा प्रस्ताव शिवसेना (ठाकरे गट)च्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडल्याने शहरात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रस्तावाला मनसेकडून पाठिंबा मिळाला असला, तरी एमआयएमने याला विरोध दर्शविल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

या प्रस्तावाचे समर्थन करताना पेडणेकर यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्या ‘मनाचे श्लोकां’चा उल्लेख करत हे श्लोक केवळ धार्मिक नसून सामाजिक संस्कार घडवणारे असल्याचे सांगितले. महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि संत-परंपरेचा वारसा जपणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. मोबाईल आणि आधुनिक जीवनशैलीमुळे बदललेल्या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी अशा मूल्याधिष्ठित शिक्षणाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी पेडणेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही संदर्भ देत त्यांच्या बालपणी मनाचे श्लोकांचा प्रभाव असल्याचा दावा केला. त्यांनी सांगितले की, शाळेत मनाचे श्लोक शिकवले जात असत आणि त्यातून स्पर्धाही घेतल्या जात. या संस्कारांचा परिणाम पुढे जाऊन चांगला नागरिक घडण्यात होतो, असेही त्यांनी म्हटले. देशाला संविधान देणाऱ्या बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वावरही अशा संस्कारांचा प्रभाव दिसतो, असे पेडणेकर यांनी सांगितले.

मुंबईतील सर्व प्रकारच्या शाळांमध्ये—महापालिका, अनुदानित तसेच खासगी—हा उपक्रम राबवावा, असे आवाहनही त्यांनी केले. सर्वधर्मीय विद्यार्थी एकत्र शिक्षण घेत असल्याने हे श्लोक कोणत्याही एका धर्मापुरते मर्यादित नसून सामाजिक मूल्ये देणारे असल्याचा दावा त्यांनी केला. मराठी भाषा आणि संस्कार यांचा संगम घडवून आदर्श नागरिक तयार करण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रस्तावाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून पाठिंबा मिळाला आहे. मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, शाळांमध्ये मनाचे श्लोक शिकवणे चुकीचे नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या उच्चारांमध्ये स्पष्टता येते आणि चांगले संस्कारही घडतात. एमआयएमने या विषयाकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दुसरीकडे, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ने या प्रस्तावाला विरोध दर्शवला असून त्यामुळे राजकीय वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. शाळांमध्ये धार्मिक स्वरूपाच्या गोष्टी सक्तीने लागू करणे योग्य नसल्याचा त्यांचा आक्षेप आहे. त्यामुळे ‘मनाचे श्लोक’ सक्तीच्या निर्णयावरून मुंबईत राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande