
बीड, 03 एप्रिल (हिं.स.)। बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत असतानाच हवामानाने अचानक कूस बदलली. विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण बीड जिल्ह्याला झोडपून काढले. जिल्ह्याच्या विविध भागांत या पावसाने आंबा बागा आणि पालेभाज्यांचे अतोनात नुकसान केले असून, बळिराजा पुन्हा एकदा संकटाच्या गर्तेत सापडला आहे. या वादळी पावसामुळे काढणीला आलेल्या आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले असून पालेभाज्याही मातीमोल झाल्या आहेत.
हंगामाच्या सुरवातीलाच आंब्याचा बहर चांगला असल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र वादळी वाऱ्याने या आनंदावर विरजण घातले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता, की कैऱ्यांचा सडा झाडांखाली पडला. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आंबा बागा भुईसपाट झाल्या असून बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. फळबागाच नव्हे, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या पालेभाज्या आणि फळभाज्यांचेही या पावसाने नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भाजीपाला पिके कोलमडून पडली, तर सखल भागात पाणी साचल्याने उभ्या पिकात सड होण्याची भीती निर्माण झाली आहे. या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आणि बाजारपेठेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेपासून दिलासा मिळण्याऐवजी या पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घातली आहे. वर्षभराची मेहनत डोळ्यादेखत मातीमोल झाल्याने शेतकरीहवालदिल झाला असून, प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis