
रायगड, 03 एप्रिल (हिं.स.) : मुंबई–पुणे एक्सप्रेस हायवेवर गोवंशीय मांसाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीचा खोपोली पोलिसांनी पर्दाफाश करत चार जणांना अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी पहाटे सुमारे 5.30 वाजण्याच्या सुमारास खालापूर तालुक्यातील खोपोली फूड मॉलजवळ करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई लेनवरील कि.मी. 34/800 येथे संशयास्पद पिकअप वाहन (एमएच-01-जीए-ईई-0528) अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन भरधाव वेगात चालवत पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने बेदरकारपणे वाहन चालवून अपघात घडवून आणला, ज्यात वाहनाचे नुकसान झाले. मात्र, चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
तपासादरम्यान वाहनामध्ये गोवंश सदृश मांस आढळून आले. आरोपी क्रमांक 1 तसेच त्याचे साथीदार क्रमांक 2 व 4 हे मांसाची वाहतूक करत होते, तर आरोपी क्रमांक 3 हा व्यापारी ते खरेदी करून विक्री करणार असल्याचे उघड झाले आहे. या सर्वांनी संगनमताने गोवंशीय प्राण्यांची कत्तल करून मांस विक्रीसाठी वाहतूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणात चार आरोपींना दुपारी अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान एकूण 14 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 115/2026 नोंदविण्यात आला असून भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)