
रायगड, 03 एप्रिल (हिं.स.) : रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांवर यंदा अभूतपूर्व आर्थिक संकट ओढवले आहे. नेहमीच्या हंगामाच्या तुलनेत तब्बल एक महिना आधीच अनेक मासेमारी बोटी किनाऱ्यावर उभ्या राहिल्या आहेत.
मासळी उत्पादनातील घट, डिझेल दरवाढ, समुद्रातील प्रदूषण आणि अनधिकृत मासेमारी या प्रमुख कारणांमुळे कोळी बांधवांची परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या काही वर्षांत कोकण किनारपट्टीवरील हवामानात झालेल्या बदलांचा मोठा परिणाम मासेमारीवर झाला आहे. अनियमित पाऊस, वादळी वारे आणि समुद्रातील बदलत्या प्रवाहांमुळे मासेमारी अनिश्चित झाली आहे.
औद्योगिक सांडपाण्यामुळे वाढलेल्या रासायनिक प्रदूषणामुळे मासळी उत्पादन घटल्याची तक्रार मच्छिमारांनी केली आहे. त्यामुळे पारंपरिक मासेमारीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे ते सांगतात. दरम्यान, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे डिझेल दरात झालेल्या वाढीमुळे मासेमारीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, अनेक मच्छिमारांनी तोटा टाळण्यासाठी बोटी समुद्रात न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय, बंद हंगामात एलईडी लाईटच्या सहाय्याने होणाऱ्या अनधिकृत मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारांना मोठा फटका बसत आहे.
मुख्य हंगामातही अपेक्षित प्रमाणात मासळी मिळत नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती अधिकच ढासळली आहे.
अलिबाग, रेवस आणि मुरूड परिसरात सुसज्ज जेट्टी सुविधांचा अभाव असल्याने बोटी वाळूत उभ्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे बोटींचे नुकसान होत असून दुरुस्तीचा खर्च वाढत आहे. काही मच्छिमार सध्या ‘रापण’ पद्धतीने मासेमारी करत असले तरी त्यातून मिळणारे उत्पन्न अत्यल्प आहे.एकूणच, वाढता खर्च, घटते उत्पन्न आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांचे जीवन संकटात सापडले असून, तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)