
बीड, 03 एप्रिल (हिं.स.)।नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्र कल्पांतर्गत (पोकरा) राबविल्या जाणाऱ्या गावस्तरावरील कृषी अवजारे बँक योजनेसाठी अर्ज करण्यास आता २५ एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेद्वारे ग्रामीण भागातील महिला बचत गटांना आर्थिक सक्षम करण्यासोबतच शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत ग्राम पातळीवर कृषी अवजार बँक स्थापन करण्यासाठी प्रकल्पाच्या एकूण मूल्याच्या ६० टक्क्यांपर्यंत, म्हणजेच कमाल २४ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते. उमेद आणि माविम पुरस्कृत महिला बचत गट तसेच महिला गाव संघ या योजनेसाठी पात्र आहेत. प्रत्येक गावातून केवळ एकाच गटाची निवड केली जाईल. एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास ऑनलाइन लॉटरी पद्धतीने लाभार्थी निवडले जातील. इच्छुक गटांनी २५ एप्रिलपर्यंत पोकराच्या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांनी केले आहे. महिला गटांनी या संधीचा लाभ घेऊन स्वावलंबी व्हावे, असे प्रशासनाने म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis