
कोल्हापूर, 03 एप्रिल (हिं.स.) : महिला शेतकऱ्यांचा वेंगुर्ला येथे आयोजित राज्यांतर्गत अभ्यास दौरा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कोल्हापूर अंतर्गत सन 2025-26 या वर्षासाठी हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात महिला शेतकऱ्यांनी कोकण किनारपट्टीवरील आधुनिक फळशेती तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष निरीक्षण केले आणि अनुभव मिळवला.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार हा अभ्यास दौरा कोकण भागातील हवामानाला अनुरूप विकसित करण्यात आलेल्या फळपिकांचे उत्पादन तंत्रज्ञान, सुधारित वाण, प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धनाच्या संधी याबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने आयोजित केला गेला होता. महिला शेतकऱ्यांनी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले येथील विविध प्रक्षेत्रांना भेट देत काजू, आंबा, नारळ, सुपारी आणि इतर फळपिकांच्या नवीन वाणांची प्रत्यक्ष पाहणी केली.
दौर्यादरम्यान तज्ज्ञांनी उच्च उत्पादन देणाऱ्या जाती, हवामानानुसार लागवड पद्धती, रोपांची निवड, लागवड अंतर, खत व्यवस्थापन, सूक्ष्म सिंचन पद्धती तसेच रोग-कीड नियंत्रण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. काजू आणि आंबा पिकांमध्ये कलम करण्याच्या विविध पद्धतींचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. तसेच रोपवाटिका उभारणी, दर्जेदार कलमे तयार करणे, झाडांची छाटणी, फुलोरा वाढविण्याच्या पद्धती आणि उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान याबाबत प्रत्यक्ष माहिती दिली गेली.
याशिवाय काढणीनंतर फळांचे वर्गीकरण, पॅकिंग, साठवणूक, वाहतूक व्यवस्थापन तसेच प्रक्रिया उद्योगाद्वारे मूल्यवर्धन करून अधिक उत्पन्न मिळविण्याच्या संधींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. काजूपासून विविध प्रक्रिया उत्पादने, आंबा पल्प, जॅम, जेली, लोणची तसेच इतर मूल्यवर्धित उत्पादनांची माहितीही दिली गेली.
या अभ्यास दौऱ्यामुळे आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबतचे ज्ञान वाढल्याचे सहभागी महिला शेतकऱ्यांनी सांगितले. कोकणातील यशस्वी फळशेती मॉडेल पाहून आपल्या भागातही अशा पद्धती अवलंबण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. महिला शेतकऱ्यांनी शेतीकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
सदर अभ्यास दौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, आत्मा उपसंचालक रवींद्र तांगड यांनी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी एकनाथ गुरव, महादेव खुडे, ओ.एस.डी. योगेश देशमाने आणि सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक सुनील कांबळे यांनी विशेष प्रयत्न करून दौरा यशस्वी केला. श्रद्धा शहाजी देसाई (कृषि सेवक, मिणचे बु) आणि नेहा तानाजी रेडेकर (कृषि सेवक, वेसर्डे) यांनी महिला शेतकऱ्यांचे समन्वय, नियोजन आणि मार्गदर्शनामध्ये सक्रिय भूमिका बजावली.
----------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar