अजिंठा लेणी येथे मधमाश्यांचा पुन्हा हल्ला; ८२ पर्यटक जखमी
छत्रपती संभाजीनगर, 03 एप्रिल (हिं.स.)। जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात मधमाश्यांनी पर्यटकांवर भीषण हल्ला चढवला. या घटनेत तब्बल ८२ पर्यटक जखमी झाले असून, गेल्या दोन महिन्यांतील ही सहावी घटना आहे. वारंवार घडणाऱ्या या जीवघेण्या प्रकार
अजिंठा लेणी येथे मधमाश्यांचा पुन्हा हल्ला; ८२ पर्यटक जखमी


छत्रपती संभाजीनगर, 03 एप्रिल (हिं.स.)।

जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात मधमाश्यांनी पर्यटकांवर भीषण हल्ला चढवला. या घटनेत तब्बल ८२ पर्यटक जखमी झाले असून, गेल्या दोन महिन्यांतील ही सहावी घटना आहे. वारंवार घडणाऱ्या या जीवघेण्या प्रकारामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लेणी क्रमांक १० जवळील पोळ्यातील माश्या अचानक आक्रमक होऊन पर्यटकांवर तुटून पडल्या. त्यानंतर लेणी क्रमांक ४, ९ आणि २६ समोरील मधमाश्यांनीही हल्ला केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना भारतीय पुरातत्त्व विभागाच्या कार्यालयात प्राथमिक उपचार देऊन काहींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने लेणी क्रमांक २ आणि २० च्या पुढे पर्यटकांना जाण्यास बंदी घातली.

लेणी परिसरात सुमारे १३ मधमाश्यांची पोळी असून, ती स्थलांतरित करण्याची मागणी गेल्या दोन महिन्यांपासून होत आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पर्यटकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी जोर धरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande