डोंबिवली - एमआयडीसी कंपन्यांची रासायनिक सांडपाणी वाहिनी फुटली
डोंबिवली, 03 एप्रिल, (हिं.स.)। एमआयडीसी पेंढारकर कॉलेज जवळील रासायनिक कंपन्यांचा सांडपाणी वाहून न्यायच्या सांडपाणी वाहिनी गुरुवारी रात्री फुटून ते सर्व पाणी रस्त्यावरून वाहू लागले होते. त्यामुळे परिसरात सर्वत्र रासायनिक दुर्गंधी पसरून प्रदूषण वाढले
Photo 1


डोंबिवली, 03 एप्रिल, (हिं.स.)। एमआयडीसी पेंढारकर कॉलेज जवळील रासायनिक कंपन्यांचा सांडपाणी वाहून न्यायच्या सांडपाणी वाहिनी गुरुवारी रात्री फुटून ते सर्व पाणी रस्त्यावरून वाहू लागले होते. त्यामुळे परिसरात सर्वत्र रासायनिक दुर्गंधी पसरून प्रदूषण वाढले होते. सदर सांडपाणी वाहिनी फुटल्याचे समजल्यावर एमआयडीसी कर्मचाऱ्यांनी तातडीने रात्री पहाटे अडीच वाजता सांडपाणी प्रवाह खंडित करून दुरुस्तीचे काम चालू केले आहे. ही सांडपाणी वाहिनी गटाराच्या कामामुळे फुटली असल्याचे समोर येत आहे.

गुरुवारी निवासी भागातील महानगर गॅस वाहिनी आणि महावितरणची भूमिगत केबल या एमआयडीसी ठेकेदारचा गटाराच्या कामाच्यावेळी जेसीबीचा धक्का लागून नादुरुस्त झाल्या होत्या. यामुळे कित्तेक तास रहिवाशांना वीज आणि गॅस विना राहावे लागले होते. मिलापनगर तलाव परिसरात गुरुवारी दुपारी अडीच वाजता गेलेली वीज रात्री दीड वाजता 11तासाने आली. ऐन उन्हाळ्यात अशी परिस्थिती होत असल्याने येथील नागरिक संतापले आहेत.

एमआयडीसी ठेकेदाराचे कर्मचारी हे येथील प्रत्येक कामात निष्काळजीपणा दाखवीत असल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. यामुळे मोठा असंतोष नागरिकांत निर्माण झाला असून एमआयडीसी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीनी यात लक्ष घालावे अशी संतप्त मागणी रहिवाशांकडून होत आहे. मिलापनगर मधील रहिवाशी विख्यात बालरोग तज्ज्ञ डॉ. मंगेश पाटे यानी या बेजबाबदार ठेकेदारावर कारवाई करावी, चुकीच्या पद्धतीने चाललेली गटाराची कामे योग्य पद्धतीने करावी अन्यथा उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या बरोबर निवासी भागातील रहिवाशी पण उपोषणाला बसतील असे काही रहिवाशांनी संतापून सांगितले आहे.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande