
लातूर, 03 एप्रिल, (हिं.स.)। स्थानिक अर्थकारणात अग्रगण्य असलेल्या महेश अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अहमदपूर (जि. लातूर) या बँकेने आपला प्रगतीचा आलेख कायम राखत मार्च २०२६ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे. बँकेने ३ कोटी ८६ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असून, अत्यंत शिस्तबद्ध नियोजनामुळे बँकेचा 'नेट एनपीए' (Net NPA) शून्य टक्क्यावर आणण्यात यश संपादन केले आहे.
बँकेच्या प्रगतीबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, मार्च २०२६ अखेर बँकेचे भागभांडवल १६.८२ कोटी रुपये झाले आहे. बँकेकडे असलेल्या ठेवींचा आकडा ४८७.२३ कोटींवर पोहोचला असून, २७८.१२ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सहकार खात्याच्या नियमांचे काटेकोर पालन करत बँकेने आपला विश्वासार्हता जपली आहे.
बँकेच्या या यशाबद्दल राज्याचे सहकारमंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे. बँकेचे संचालक मंडळ, व्यवस्थापन, अधिकारी, कर्मचारी आणि पिग्मी एजंट यांनी वसुलीचे धोरण अत्यंत प्रभावीपणे राबवल्यामुळेच हे यश शक्य झाले आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच आगामी आर्थिक वर्षासाठी बँकेला शुभेच्छा दिल्या.
बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना सांगितले की, केवळ नफा कमावणे हा बँकेचा मुख्य उद्देश नसून, तळागाळातील सामान्य आणि गरजू व्यक्तींना आर्थिक मदत करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. बँकेने आता १६ शाखांपर्यंत आपला विस्तार केला असून, तंत्रज्ञानाच्या जोडीने ग्राहकांना सक्षम बँकिंग सेवा पुरवली जात आहे.
बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापक सिद्राम रंदाळे, प्र. सरव्यवस्थापक प्रशांत मांडवकर आणि संपूर्ण कर्मचारी वृंदाने घेतलेल्या परिश्रमामुळेच सभासद आणि खातेदारांचा विश्वास सार्थ ठरला आहे. बँकेच्या या प्रगतीमध्ये सर्व सभासद, व्यापारी आणि हितचिंतकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल व्यवस्थापक सिद्राम रंदाळे यांनी आभार मानले असून, सर्वांनी आपले आर्थिक व्यवहार आपल्याच बँकेतून करावेत, असे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis