पुणे - उपमहापौर बाबर यांच्याकडून विद्यार्थ्यांना शहराच्या इतिहासाच्या धडे
पुणे, 03 एप्रिल (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर कक्षात आज उर्दू माध्यमिक विद्यालय,रुपीनगर येथील विद्यार्थी व शिक्षकांनी स्थानिक इतिहास विषयाच्या अभ्यासासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जिज्ञास
dnejwdsf


पुणे, 03 एप्रिल (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उपमहापौर कक्षात आज उर्दू माध्यमिक विद्यालय,रुपीनगर येथील विद्यार्थी व शिक्षकांनी स्थानिक इतिहास विषयाच्या अभ्यासासाठी उपमहापौर शर्मिला बाबर यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जिज्ञासेला चालना देण्यासाठी आयोजित या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशासनाची ओळख करून देण्यात आली.

या प्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पिंपरी चिंचवड शहराच्या इतिहासाची माहिती दिली. औद्योगिक विकास,स्थलांतरित लोकसंख्या,तसेच नियोजनबद्ध नागरीकरणामुळे शहराने कशाप्रकारे प्रगती साधली,याचे त्यांनी सोप्या भाषेत विवेचन केले. महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध लोकाभिमुख योजना,मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित सेवा यांचीही माहिती विद्यार्थ्यांना दिली.

विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने संवादात सहभाग घेत विविध प्रश्न विचारले. शहरातील पायाभूत सुविधा,शिक्षण,स्वच्छता,पर्यावरण संवर्धन यासंदर्भात विद्यार्थ्यांनी प्रश्ने विचारली. या संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत जागरूकता निर्माण झाली.

यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी विद्यार्थ्यांना महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांची रचना,त्यांच्या कार्यपद्धती आणि जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती दिली. करसंकलन,आरोग्य,बांधकाम परवाने,पाणीपुरवठा,स्वच्छता अशा विविध विभागांमार्फत शहराचा कारभार कसा चालतो,याचे त्यांनी स्पष्टीकरण केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.

या भेटीत शाळेच्या शिक्षक समितीचे अध्यक्ष अशफाक शेख,शिक्षक मोहम्मद आतिफ फैजल,शिक्षिका ताहेरा शेख तसेच विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांनीही अशा प्रकारच्या शैक्षणिक भेटी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत असल्याचे मत व्यक्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहासासोबतच नागरी प्रशासनाची प्रत्यक्ष ओळख झाली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande