
पुणे, 03 एप्रिल (हिं.स.)। प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (पीएमजेएवाय) व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (एमजेपीजेएवाय) यांच्या अंमलबजावणीचा विभागीय आढावा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच सर्किट हाऊस, पुणे येथे घेण्यात आला.
बैठकीस पुणे विभागाचे आरोग्य संचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येमपल्ले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हनकारे, योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉ. वैभव गायकवाड तसेच पुणे जिल्हा समन्वयक डॉ. प्रीती लोखंडे उपस्थित होत्या.
बैठकीत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे का, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सर्व शासकीय रुग्णालयांनी अंगीकृत होऊन प्रत्येक पात्र रुग्णावर उपचार योजनेंतर्गतच करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी (PHC) योजनेंतर्गत २५ उपचार प्रक्रियांची तरतूद असून, त्या प्रक्रियांमध्ये बसणाऱ्या रुग्णांचे प्री-ऑथोरायझेशन योजनेच्या पोर्टलवरून पाठविल्यास संबंधित पीएचसीला क्लेम मिळणार आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांना निधी उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
योजनेतील २२३ ‘गव्हर्नमेंट रिझर्व्ह्ड’ प्रक्रियांतर्गत उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांनी पात्र रुग्णांचे प्री-ऑथोरायझेशन करणे अनिवार्य असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
पुणे विभागातील सर्व उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांनी पुढील एका महिन्यात योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार सुरू करावेत, त्याचा आढावा महिन्यानंतर घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. योजनेंतर्गत उपचार न करणाऱ्या रुग्णालयांच्या नोडल अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले.
अंगीकृत खासगी रुग्णालयांविषयी तक्रारी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० किंवा त्याहून अधिक खाटांची रुग्णालये अंगीकृत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही देण्यात आले.
पुणे विभागातील सर्व शासकीय रुग्णालये पीएमजेएवाय व एमजेपीजेएवाय योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान करतील, असा विश्वास आरोग्य संचालक डॉ. भगवान पवार यांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु