रत्नागिरी : राजापूर नगरपालिकेचा १५० कोटी विकासाचा संकल्प
रत्नागिरी, 3 एप्रिल, (हिं. स.) : दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या राजापूर नगरपालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शहराच्या सर्वांगीण विकासाचा मोठा संकल्प जाहीर करण्यात आला आहे. नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत
रत्नागिरी : राजापूर नगरपालिकेचा १५० कोटी विकासाचा संकल्प


रत्नागिरी, 3 एप्रिल, (हिं. स.) : दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या राजापूर नगरपालिकेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शहराच्या सर्वांगीण विकासाचा मोठा संकल्प जाहीर करण्यात आला आहे. नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत १५० कोटी रुपयांच्या विकासकामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याची माहिती दिली.

राजापूर पालिकेची गौरवशाली वाटचाल नागरिकांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत, या महोत्सवी वर्षात सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसोबतच विकासकामांना गती देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आपले राजापूर स्वच्छ व सुंदर राजापूर” हा निर्धार ठेवत ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत शहराच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणावर भर दिला जाणार आहे.प्रस्तावित विकासकामांमध्ये नवीन प्रशासकीय इमारत उभारणी, अधिकारी-कर्मचारी निवासस्थाने, वैशंपायन गुरुजी पुलालगत नवीन मोठा पूल, जवाहर चौकाचे सुशोभीकरण, नदीकिनारी सौंदर्यीकरण, राजीव गांधी क्रीडांगणाचा विकास, भिकाजीराव चव्हाण उद्यानाचे आधुनिकीकरण यांचा समावेश आहे. याशिवाय शहरात सीसीटीव्ही यंत्रणा, डिजिटल जाहिरात प्लॅटफॉर्म, स्वागत कमानींचे नूतनीकरण आणि व्यापारी संकुल उभारणी यासारख्या योजनाही राबविण्यात येणार आहेत.

पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा करताना नळांना मीटर बसविणे आणि कोदवली धरणाच्या कामामुळे पुढील वर्षापासून दररोज चार तास मुबलक पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘हरित राजापूर’ उपक्रमांतर्गत शहरात पाच हजार झाडे लावली जाणार आहेत.पर्यटन विकासासाठी श्री देव धूतपापेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी निधी उपलब्ध करण्यात आला असून हे काम लवकरच पूर्ण केले जाणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांमधून शहराच्या विकासाला गती देण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्षांनी नमूद केले.शहराच्या विकासासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे आणि आमदार किरण सामंत यांचे सहकार्य लाभत असल्यामुळे विकासाला निश्चितच वेग येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.पत्रकार परिषदेला कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande