
पुणे, 03 एप्रिल, (हिं.स.)। पिंपरी चिंचवड शहरातील करदात्यांच्या भक्कम सहकार्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका विविध विकास प्रकल्प आणि लोकाभिमुख उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये शहरातील नागरिकांनी वेळेत कर भरून आपली जबाबदारी सजगपणे पार पाडली, ही बाब महापालिकेसाठी अत्यंत प्रेरणादायी असून मी सर्व करदात्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. महापालिकेला कराच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा उपयोग नागरिकांच्या कल्याणासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृह येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी महापौर रवि लांडगे बोलत होते.
या पत्रकार परिषदेस विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा,कला,साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, उपआयुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, राजेश आगळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच पत्रकार उपस्थित होते.
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मालमत्ता कर,पाणीकर,अग्निशमन सेवा शुल्क,झोपडपट्टी सेवाकर,बांधकाम परवानगी शुल्क,आकाशचिन्ह परवाना शुल्क अशा विविध माध्यमातून महसूल वसुलीसाठी सुयोग्य नियोजन करणाऱ्या महापालिकेच्या विविध विभागाचे विभागप्रमुख,अधिकारी,कर्मचारी यांचेही महापौर रवि लांडगे यांनी यावेळी अभिनंदन केले.
महापौर रवि लांडगे म्हणाले,महापालिकेच्या महसूलवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून,ऑनलाईन कर भरणा,सवलत योजना आणि सुलभ सेवा यांमुळे कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली आहे. करप्रक्रिया अधिक पारदर्शक,सोयीस्कर आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. भविष्यातही करदात्यांचा विश्वास अधिक दृढ करून महसूलवाढ साध्य करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील राहील,असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु