
ठाणे, 03 एप्रिल (हिं.स.)। समाज माध्यमांवर डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरलेल्या बातम्यांनंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लावलेले निर्बंध आता शिथिल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील इंधन पुरवठा आणि वितरणाची परिस्थिती पूर्वपदावर आल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने २७ मार्च २०२६ च्या मूळ आदेशात अंशतः बदल करून नवीन सुधारित आदेश जारी केले आहेत.
या सुधारित आदेशानुसार, डिझेल पंप मालकांनी आता डिझेलचे वितरण पूर्वीप्रमाणेच करावे. मात्र, कोणत्याही कंपनी किंवा व्यक्तीकडून गरजेपेक्षा जास्त डिझेलची उचल होणार नाही, याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तसेच, वाहनांव्यतिरिक्त इतर कारणांसाठी नेल्या जाणाऱ्या डिझेलच्या नोंदी अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
याचबरोबर डिझेलचा अनधिकृत साठा करणाऱ्यांविरुद्ध 'जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५' नुसार कारवाई केली जाईल. तसेच,या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पेट्रोलियम नियम २००२, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदींनुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आले आहेत, असेही जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule