
बीड, 03 एप्रिल (हिं.स.)।परळी वैजनाथ तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींमधील सरपंच आणि सदस्यांच्या एकूण १४ रिक्त जागांसाठी येत्या २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निधन, अपात्रता, राजीनामा यांमुळे रिक्त जागांसाठी प्रक्रिया प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ७ एप्रिलपासून सुरू होईल आणि १३ एप्रिलपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. १५ एप्रिल रोजी अर्जाची छाननी होणार असून, १७ एप्रिल रोजी दुपारी ३ नंतर उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल. १८ ते २७ एप्रिल या कालावधीत प्रचार रंगणार असून २८
एप्रिलला मतदान व २९ एप्रिल रोजी मतमोजणी पार पडेल. या प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, संबंधित गावचे ग्रामसेवक सहाय्यक अधिकारी म्हणून काम पाहतील. परळी तालुक्यातील सिरसाळा, मरळवाडी, जळगव्हाण, नागदा, आनंदवाडी, धर्मापुरी, दैठणाघाट, हेळंब, सारडगाव, वानटाकळी, नागपिंपरी, पांगरी, देशमुख टाकळी आणि जयगाव या ग्रामपंचायतींत ही निवडणूक होत आहे. यामध्ये सिरसाळा, मरळवाडी आणि जळगव्हाण येथे सरपंच पदासाठी, तर उर्वरित ठिकाणी सदस्य पदासाठी मतदान घेतले जाणार
आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis