
पुणे, 03 एप्रिल (हिं.स.)।
मतदार यादी अचूक आणि अद्ययावत ठेवण्यासाठी केंद्र शासनाकडून मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहेत. हे काम करण्यात दिरंगाई केल्या प्रकरणी एका शिक्षकासह लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक अनिल गायकवाड (वय ४२) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले शिक्षक हे उर्दू शाळेत शिक्षक आहेत. गुन्हा दाखल करण्यात आलेला लिपिक सार्वजनिक बांधकाम विभागात आहे. दोघांची केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दोघांनी हे काम करण्यास दिरंगाई करुन कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी लोकप्रतिनिधी कायदा १९५१ च्या कलम १३४ नुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु