
सोलापूर, 03 एप्रिल (हिं.स.)। पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगोला येथे आयोजित विश्वमंगल मराठी फाउंडेशनची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत फाउंडेशनच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि आगामी उपक्रमांची रूपरेषा निश्चित करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, मराठी भाषेचा व्यापक प्रसार, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या गुणवत्ता वृद्धीसाठी शाळा सुधारणा उपक्रम राबवण्यावर विशेष भर देण्यात आला. संत ज्ञानेश्वर माउली यांच्या ७५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने “पसायदान”चा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.यासोबतच, राज्यांतर्गत, इतर राज्यांतील तसेच परदेशातील मराठी बांधवांशी संपर्क वाढवून फाउंडेशनचा विस्तार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर बैठक आगामी कार्यासाठी दिशादर्शक ठरली असून, अधिक व्यापक सामाजिक व सांस्कृतिक कार्य उभारण्याचा दृढ संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी सांगोला येथील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी व सदस्यांची उपस्थिती लाभली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड