रत्नागिरी : लांज्यात महामार्गानजीक बिबट्याचा मृतदेह
रत्नागिरी, 4 एप्रिल, (हिं. स.) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा येथील एका कुक्कुटपालन संस्थेच्या आंबा, नारळ आणि काजूच्या बागेत एक मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात या बिबट्याचा मृत्यू झाला असावा,
रत्नागिरी : लांज्यात महामार्गानजीक बिबट्याचा मृतदेह


रत्नागिरी, 4 एप्रिल, (हिं. स.) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांजा येथील एका कुक्कुटपालन संस्थेच्या आंबा, नारळ आणि काजूच्या बागेत एक मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे झालेल्या अपघातात या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तवला आहे.

लांजा येथील कुक्कुटपालन संस्थेचे संचालक प्रवीण जेधे यांना आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास बागेत बिबट्या मृतावस्थेत पडलेला दिसला. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती वन विभागाला दिली. माहिती मिळताच लांजा येथील वनपाल आणि वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. हा बिबट्या साधारण दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत झाला असावा, अशी शक्यता घटनास्थळावरील परिस्थितीवरून व्यक्त करण्यात आली.

लांजा येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याची तपासणी केली असता त्याच्या डोक्याला आणि कमरेला गंभीर जखमा झाल्याचे दिसून आले. एखाद्या अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेमुळेच या जखमा होऊन बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मृत बिबट्या हा मादी जातीचा असून त्याचे वय अंदाजे सहा महिने आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले.

ही कारवाई रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये वनपाल धुळू कोळेकर, वनरक्षक नमिता कांबळे आणि बचाव पथकाचे सदस्य अमित लांजेकर यांनी सहभाग घेतला. नागरिकांनी वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास किंवा अशा घटना घडल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande