रत्नागिरी : कोकणातील बागायतदारांची गुरुवारी पुण्यात विशेष बैठक
रत्नागिरी, 5 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा बागायतदारांची एक विशेष बैठक खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पुण्यात कृषी आयुक्तालयात येत्या गुरुवारी, दि. ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर
रत्नागिरी : कोकणातील बागायतदारांची गुरुवारी पुण्यात विशेष बैठक


रत्नागिरी, 5 एप्रिल, (हिं. स.) : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा बागायतदारांची एक विशेष बैठक खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पुण्यात कृषी आयुक्तालयात येत्या गुरुवारी, दि. ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना यावर्षी चुकीची किंवा भेसळयुक्त कीटकनाशके आणि औषधांटा पुरवठा झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत. या औषधांच्या वापरामुळे आंबा पिकावर गंभीर विपरीत परिणाम दिसून आला असून फळगळ, झाडांची हानी तसेच मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना अनेक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यासंदर्भात स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पाठविलेल्या पत्रानुसार संबंधित औषध कंपन्या, त्यांचे अधिकृत प्रतिनिधी आणि बाधित शेतकरी प्रतिनिधी यांच्यात चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ही बैठक ९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता पुण्यात कृषी आयुक्तालयातील पद्मश्री सभागृहात होणार आहे. बैठकीत चुकीची, भेसळयुक्त औषधे पुरविणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी, शेतकऱ्यांना झालेला आर्थिक तोटा, विविध कंपन्यांच्या विक्री दरांतील मोठ्या तफावतीमुळे होणारी आर्थिक पिळवणूक यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यात कीटकनाशकांचा पुरवठा करणाऱ्या सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच संबंधित शेतकरी प्रतिनिधींना या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी निमंत्रित केले आहे.

आंबा बागायतदारांच्या हिताचे रक्षण, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना ठरविणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असेल. बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांनी बागायतदारांना केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande