शिक्षणमंत्र्यांच्या दारात पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे 'भीक मांगो' आंदोलन
दादा भुसेंच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटीचा आरोप मालेगाव, 05 एप्रिल (हिं.स.)। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या
शिक्षणमंत्र्यांच्या दारात पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांचे 'भीक मांगो' आंदोलन


दादा भुसेंच्या कार्यकर्त्यांकडून दमदाटीचा आरोप

मालेगाव, 05 एप्रिल (हिं.स.)। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे, आपल्या मागण्या मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ महिलांनी 'भीक मांगो' आंदोलन केले. यावेळी जमा झालेली रक्कम शिक्षण विभागाला मनीऑर्डरद्वारे पाठवून आपला संताप व्यक्त करण्याचा निर्णय आंदोलकांनी घेतला आहे.

आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संस्थापक अध्यक्षा संगिता सोनवणे आणि आयटकचे हिम्मत गवई यांनी सांगितले की, आठ महिन्यांपूर्वी शिक्षणमंत्र्यांनी या महिलांच्या शिष्टमंडळाची भेट मुख्यमंत्री महोदयांशी घालून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नऊ महिने उलटूनही त्यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही पदरी निराशाच आल्याने अखेर महिलांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.व आज हे आंदोलन करण्यात आले यावेळी दादा भुसेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला मोर्चा काढू नका साहेबांनी जीआर काढला आहे तुम्ही ऑफिसवर चला मोर्चा रद्द करा असे सांगितले व काही महिलांना दमबाजी देखील केली याबाबत जिल्हाध्यक्ष रामा मिस्त्री यांच्याकडे विचारणा केली असता ते आमचे कार्यकर्ते नव्हते अशी वेळ मारून नेण्यात आली.

*शिवरायांना अभिवादन करून मोर्चाची सुरुवात*

आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर या मोर्चाला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांनी सरकारच्या धोरणांचा निषेध करत घोषणाबाजी केली. भर उन्हात महिलांनी गावोगावी फिरून भीक मागितली आणि गोळा झालेला पैसा सरकारी अनास्थेचा पुरावा म्हणून शिक्षण विभागाला पाठवण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

*सत्ताधारी कार्यकर्त्यांकडून आंदोलकांना दमदाटी?*

आंदोलन सुरू असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला. संगिता सोनवणे यांनी आरोप केला की, मंत्री दादा भुसे यांच्या काही कार्यकर्त्यांनी आणि महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलक महिलांना धमकावण्याचा प्रयत्न केला. जर मोर्चा काढला तर साहेब तुमच्यावर फुली मारतील, अशा शब्दांत त्यांना दडपशाही करण्याचा प्रयत्न झाला. यावर बोलताना सोनवणे म्हणाल्या, लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा आम्हाला घटनादत्त अधिकार आहे. अशा प्रकारे दमदाटी करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. आंदोलकांनी इशारा दिला आहे की, जर आताही आश्वासनांची पूर्तता झाली नाही, तर यापुढे कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून आमचा हक्क मागत आहोत, पण जर दडपशाही थांबली नाही, तर होणाऱ्या परिणामांना महाराष्ट्र शासन जबाबदार असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता शिक्षण विभाग आणि मंत्री महोदय यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande