
अकोला, 06 एप्रिल (हिं.स.)।“सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवत अकोला शहरात मोरणा नदी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि जनसंवाद कार्यक्रमांतर्गत हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून जनतेच्या सहभागातून मोरणा नदीतील जलकुंभी काढणे व नदी स्वच्छता केली जाणार आहे. या अभियानाचा शुभारंभ भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते होणार असून हा उपक्रम स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकारला आहे. महानगर अध्यक्ष जयंत मसने यांनी याबाबत माहिती दिली.
जनसहभागातून स्वच्छतेचा संकल्प
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर राबवलेल्या स्वच्छता अभियानाप्रमाणेच अकोल्यातही जनतेच्या सहभागातून हे अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी 2001 च्या दुष्काळात तत्कालीन खासदार संजय धोत्रे यांनी रेन हार्वेस्टिंगद्वारे पाणीटंचाईवर मात केली होती. त्याच धर्तीवर हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाची माहिती
सदर अभियानाची सुरुवात 7 एप्रिल, मंगळवार रोजी सकाळी 8 वाजता निमवाडी गणेश घाट, लक्झरी बस स्टँड परिसरातून होणार आहे. अकोला महानगरपालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडणार आहे.
सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
या मोहिमेत आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, पालकमंत्री ॲड. आकाश कुंडकर, तसेच विविध आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. “स्वच्छ अकोला” या संकल्पनेतून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संजय गोटफोडे, ॲड. देवाची काकड, माधव मानकर, अंबादास उमाळे, राजेश नागमते, आम्रपाली उपरवट, अमोल गीते, नितेश पाली, रंजीत खेडकर, संदीप गावंडे, संजय कोरडे, पवन महल्ले, वैशाली शेळके, पुरुषोत्तम पानझाडे, राजेंद्र गिरी, गोपाल मुळे, तुषार भिरड, चंदाताई शर्मा, निकिता देशमुख आदींनी केले आहे. अकोला शहरातील मोरणा नदी स्वच्छतेसाठीचा हा उपक्रम जनसहभागातून एक आदर्श निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे