महात्मा फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात २०० दिवस – २०० उपक्रम अभियानाची मागणी
अकोला, 06 एप्रिल (हिं.स.) । महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मशताब्दीच्या आगामी द्विशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाची व्यापक चळवळ उभारण्याची मागणी निलेश देव (गटनेता, वंचित बहुजन आघाडी) यांनी केली आहे. “२०० दिवस
महात्मा फुले द्विशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात २०० दिवस – २०० उपक्रम अभियानाची मागणी


अकोला, 06 एप्रिल (हिं.स.) । महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मशताब्दीच्या आगामी द्विशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात सामाजिक प्रबोधनाची व्यापक चळवळ उभारण्याची मागणी निलेश देव (गटनेता, वंचित बहुजन आघाडी) यांनी केली आहे.

“२०० दिवस – २०० उपक्रम : महात्मा फुले विचार घराघरात” हे राज्यव्यापी अभियान राबविण्याचा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला.

सन २०२७ मध्ये फुले यांच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होत आहेत. निलेश देव यांच्या मते, स्त्री शिक्षण, शेतकरी हक्क, सामाजिक समता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या फुलेंच्या विचारांचा व्यापक प्रसार राज्य शासनाने करण्याची ही ऐतिहासिक संधी आहे.

अभियानाच्या माध्यमातून सलग २०० दिवसांत राज्यभर २०० समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा आराखडा मांडण्यात आला आहे. यामध्ये शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक समता, युवक नेतृत्व, पर्यावरण संरक्षण आणि शेतकरी विकास यांसारख्या विषयांवर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

प्रस्तावानुसार गरीब विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, डिजिटल वाचनालय, महिला आरोग्य तपासणी शिबिरे, स्वयंरोजगार प्रशिक्षण, संविधान जनजागृती अभियान, सामाजिक समता रॅली, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, वृक्षारोपण, जलसंधारण उपक्रम आणि शेतकरी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याची संकल्पना आहे.

अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती, विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली विभागीय समिती, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शहर व तालुका समित्या स्थापन करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे. याशिवाय “महात्मा फुले विचार यात्रा”, “समता परिषद”, समाजसुधारक विचार महोत्सव आणि “फुले समता पुरस्कार” यांसारखे राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

विद्यार्थ्यांसाठी अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी “डिजिटल फुले ज्ञान पोर्टल” सुरू करण्याचीही संकल्पना प्रस्तावात नमूद आहे. निलेश देव म्हणाले, “महात्मा फुले यांचे विचार समाजात समता, बंधुता आणि शिक्षणाची नवी चळवळ निर्माण करण्यास प्रेरणा देतात. द्विशताब्दी वर्ष हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण आहे, आणि राज्य शासनाने ‘२०० दिवस – २०० उपक्रम’ अभियान अधिकृतपणे जाहीर करावे.”

--------------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande