रत्नागिरी : मनाचे श्लोक स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात
रत्नागिरी, 5 एप्रिल, (हिं. स.) : चिपळूण येथील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये वनौषधी विभागाने आयोजित केलेल्या मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरुदक्षिणा सभागृहात उत्साहात झाले. शाळेत १९८८ पासून वनौषधी विषया
मनाचे श्लोक स्पर्धेतील सहभागी आणि विजेते विद्यार्थी


रत्नागिरी, 5 एप्रिल, (हिं. स.) : चिपळूण येथील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये वनौषधी विभागाने आयोजित केलेल्या मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण गुरुदक्षिणा सभागृहात उत्साहात झाले.

शाळेत १९८८ पासून वनौषधी विषयाचा उपक्रम राबविला जात असून सलग ३८ वर्षे हा उपक्रम सुरू आहे. विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारावी व निसर्गाशी सुसंगत जीवन जगावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

दासनवमीच्या निमित्ताने चिपळूण वैद्य मंडळाच्या सहकार्याने ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धा घेण्यात आली होती. ही स्पर्धा पाचवी ते सातवी आणि आठवी-नववी अशा दोन गटांत पार पडली. दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेचा निकाल असा - लहान गट : कार्तिक मालशे (प्रथम), राशी रहाटे (द्वितीय), साईशा झुजम (तृतीय), देवेश थत्ते (उत्तेजनार्थ). मोठा गट : साची पाटणे (प्रथम), स्पृहा चव्हाण (द्वितीय), स्नेहा पवार (तृतीय), किमया ओक (उत्तेजनार्थ).

विजेत्या विद्यार्थ्यांना कै. रमेश महादेव कानेटकर यांच्या स्मरणार्थ रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

पारितोषिक वितरण समारंभासाठी शाळेचे माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच वैद्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर, आयुर्वेद एम.डी. पदवी प्राप्त डॉ. दिव्या बैकर व संस्थेच्या संचालिका सौ. सारिका भावे उपस्थित होत्या.

कार्यक्रमात आठवीतील विद्यार्थ्यांनी वनौषधी विषयाच्या अनुभवांवर मनोगत व्यक्त केले. अक्षता माटोरे, सृष्टी पवार, धनश्री पवार, यशवर्धन कोरबू, ओम सकपाळ व अक्षय साळुंखे यांनी आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी या विषयावर निबंधलेखनही केले. उपमुख्याध्यापिका रेवती सौ. कारदगे यांनी प्रास्ताविक केले.

प्रमुख अतिथी श्री. कानडे यांनी वनौषधी विषयाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. दिव्या बैकर यांनी भविष्यातही सहकार्य करण्याची ग्वाही दिली, तर मुख्याध्यापक श्री. बनसोडे यांनी उपक्रमासाठी पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विभाग प्रमुख सौ. पेढांबकर यांनी केले. पर्यवेक्षक श्री. मुंढेकर, श्री. खाडे, श्री. कदम आणि सौ. माने यांचे सहकार्य लाभले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande