रायगडात ३१६० मे. टन पांढऱ्या कांद्याचे उत्पादन; १८.९६ कोटींची उलाढाल
रायगड, 05 एप्रिल (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात यंदा पांढऱ्या कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असून, ३१६ हेक्टर क्षेत्रातून तब्बल ३१६० मेट्रिक टन कांद्याची निर्मिती झाली आहे. या विक्रीतून सुमारे १८ कोटी ९६ लाख रुपयांची उलाढाल झाल्याची
Raigad produces 3160 million tonnes of white onion; turnover of Rs 18.96 crores


रायगड, 05 एप्रिल (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात यंदा पांढऱ्या कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असून, ३१६ हेक्टर क्षेत्रातून तब्बल ३१६० मेट्रिक टन कांद्याची निर्मिती झाली आहे. या विक्रीतून सुमारे १८ कोटी ९६ लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी तन्मय भगत यांनी दिली.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा १०० हेक्टरने क्षेत्रवाढ झाली असून, मागील वर्षी २२१ हेक्टरवर असलेली लागवड यंदा ३१६ हेक्टरवर पोहोचली आहे. पावसाळा लांबल्याने लागवड उशिरा झाली असली तरी उत्पादन चांगले मिळाले आहे. सरासरी प्रति हेक्टरी १० मेट्रिक टन उत्पादन नोंदविण्यात आले आहे.

या पिकासाठी साधारण ३.५ लाख रुपये खर्च येत असून, खर्च वजा जाता शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सुमारे २.५ लाख रुपयांचा नफा मिळत आहे. अलिबाग तालुक्यातील नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली, सगाव व वाडगाव या गावांमध्ये पांढऱ्या कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

भौगोलिक मानांकन (GI) मिळाल्यामुळे या कांद्याला बाजारपेठेत विशेष ओळख मिळाली असून मुंबई, पुणे यांसारख्या शहरांतून मोठी मागणी आहे. सध्या कांद्याला चांगला दर मिळत असून व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन खरेदी करत आहेत.

पांढऱ्या कांद्याच्या शेतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित सुधारले असून, महिलांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. अनुकूल हवामान आणि वाढती मागणी यामुळे हे पीक रायगडातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे चित्र आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande