
परभणी, 05 एप्रिल (हिं.स.)।
परभणी रेल्वे स्थानकावर रविवारी (दि. ५ एप्रिल) लिफ्टच्या दरवाज्याचा लॉक व सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करत देखभाल कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या प्रकरणाची रेल्वे प्रशासनाने दखल घेत तपास सुरू केला आहे.
माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक २/३ वरील लिफ्टमध्ये एका अज्ञात व्यक्तीने दरवाज्याचा लॉक तोडून सीसीटीव्ही कॅमेरा नुकसान केला. ही बाब ड्युटीवरील इलेक्ट्रिकल मेंटेनन्स कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी संबंधित व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या व्यक्तीने आक्रमक होत कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केली.
या प्रसंगी कर्मचाऱ्याने धैर्याने संबंधित व्यक्तीचा फोटो काढला व इतर कर्मचारी तसेच रेल्वे संरक्षण दलाला (RPF) माहिती दिली. दरम्यान, अतिरिक्त कर्मचारी व RPF घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपी पळून गेला.
घटनास्थळी तपासणीदरम्यान लिफ्टचा लॉक व सीसीटीव्ही कॅमेरा नुकसान झालेल्या अवस्थेत आढळून आले. रेल्वे प्रशासनाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला अटक करण्यासाठी कारवाई सुरू केली आहे. तसेच या प्रकरणी संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, स्थानक परिसरातील सुरक्षा वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नुकसानग्रस्त लिफ्ट व सीसीटीव्ही दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, रेल्वे मालमत्तेचे संरक्षण करावे व अशा प्रकारच्या घटना आढळल्यास तात्काळ प्रशासन किंवा RPF ला कळवावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis