रत्नागिरी : राजापूर ग्रामीण रुग्णालयातील रक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटन
रत्नागिरी, 5 एप्रिल, (हिं. स.) : राजापूर तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी असून, आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचा विश्वास आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला. राज
रत्नागिरी : राजापूर ग्रामीण रुग्णालयातील रक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटन


रत्नागिरी, 5 एप्रिल, (हिं. स.) : राजापूर तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी असून, आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचा विश्वास आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केला.

राजापूर ग्रामीण रुग्णालयातील रक्त साठवणूक केंद्राचे उद्घाटन आमदार सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. लवकरच राजापूर ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून देण्यासोबतच तालुक्यातील प्रलंबित मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी सभापती सौ. नंदिनी कदम, उपसभापती अभिजित गुरव, शिवसेना तालुका प्रमुख दीपक नागले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी लोकरे, गटविकास अधिकारी संतोष म्हेत्रे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, वैद्यकीय अधिकारी डॉ. राम मेस्त्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपसभापती अभिजित गुरव यांनी १०८ रुग्णवाहिकेच्या सेवेत सुधारणा करण्याची गरज व्यक्त केली. सध्या रुग्णांना रत्नागिरी येथे नेण्यास परवानगी असली तरी काही वेळा कोल्हापूर येथे हलविण्याची गरज भासते. अशा वेळी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे कोल्हापूर येथेही रुग्ण नेण्यासाठी १०८ सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचे निदर्शनास आणून दिले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande