
रत्नागिरी, 5 एप्रिल, (हिं. स.) : दापोली बाजारपेठेत हॉटेल सन्मानसमोर बिपिन कॉर्नरला काल रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत मोबाइल शॉपी, ज्वेलरी आदी पाच दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दापोली शहर शिवसेना शाखेजवळ असलेल्या काहींच्या दुकानातून येणारा धूर पाहून हा सगळा प्रकार लक्षात आला. तरुणांनी सतर्कता बाळगत तात्काळ मदत कार्य सुरू केले. त्यावेळी शहर बाजारपेठ येथील श्री पंचमुखी मारुती मंदिराच्या कार्यक्रमासाठी योगायोगाने उपस्थित असलेले दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी अमित रेमजे यांनी तत्काळ नगरपंचायत कार्यालयात जाऊन फायर बुलेट घेऊन ते घटनास्थळी दाखल झाले. धोपट पाणीवाले, श्री. संदीप, दिनेश नायक, नितीन शिंदे, अपी मोरे आदी नागरिकांनी आग विझवण्यासाठी तत्काळ पाण्याची व्यवस्था केली. नगरपंचायतीच्या फायर बुलेटला पाणी पुरवण्याचे मोठे काम माजी सरपंच दिनेश नायक यांनी केले.
नागरिकांनी धाडस दाखवून घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन मदत कार्य सुरू केल्याने आग आटोक्यात आणण्यात मोठे यश आले.
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दापोली नगरपंचायत प्रशासनाकडे अग्निशामक बंब नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली. खेड नगरपालिकेकडून अग्निशमक बंब बोलावण्यात आला. मात्र खेड येथून अग्निशामक बंब येईपर्यंत दापोली शहर परिसर व बाजारपेठेतील नागरिकांच्या मदतीमुळे आग आटोक्यात आणण्यात मोठे यश आले. अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी