
नांदेड, 06 एप्रिल (हिं.स.)। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नांदेड विभागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिकतेची जोड देण्याचे प्रयत्न वेगाने सुरू असून, लवकरच १५८ नव्या ई-बस ताफ्यात दाखल होणार आहेत. सध्या ३८ ई-बस प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहेत. नव्या बसेसच्या समावेशानंतर नांदेड जिल्ह्यातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासाची सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पारंपरिक 'लाल परी' आता हायटेक स्वरूपात प्रवाशांसमोर येणार आहे.
राज्यात सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दृष्टीने ई-बस प्रकल्पाला प्राधान्य दिले जात आहे. वाढते इंधनदर, प्रदूषणाचा वाढता स्तर आणि बदलती प्रवासी अपेक्षा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. सध्या ३८ ई-बस ताफ्यात सध्या नांदेड विभागात कार्यरत असलेल्या ३८ ई-बसना प्रवाशांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. वेळेवर सेवा, आरामदायी प्रवास आणि प्रदूषणमुक्त वातावरण यामुळे या बसेसची मागणी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर उर्वरित बसेस लवकरात लवकर सेवेत आणण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विभागीय स्तरावर आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
वातानुकूलन प्रणाली, आरामदायी आसन व्यवस्था, कमी आवाजात धावणारी यंत्रणा, तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा यांचा समावेश या बसमध्ये असणार आहे. त्यामुळे विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांनाही शहरासारख्या दर्जेदार सुविधांचा अनुभव मिळेल, ही या योजनेची विशेष बाब ठरणार आहे.
-------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis