
अमरावती, 06 एप्रिल (हिं.स.)
अंजनगावसुर्जी तालुक्यातील दहिगाव रेचा गावात आसरा माता मंदिराच्या परिसरात गुप्तधन शोधण्यासाठी अनोळखी व्यक्तीने तीन फुटांचा खोल खड्डा खोदून तेथे पूजा केल्याची घटना उघडकीस आली आहे. अंजनगावसुर्जी ठाण्यात याप्रकरणात मोहंमद शाकीर मोहंमद राजिक (वय ५०, रा. डब्बीपुरा, अंजनगावसुर्जी) यांच्या तक्रारीवरून दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानूष अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोणा प्रतिबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद धाडसे यांनी सांगितले. दहिगाव रेचा येथील साखर कारखाना हा बऱ्याच वर्षांपासून बंद स्थितीत असला तरी येथे १९९५ पासून मोहंमद शाकीर मो. राजिक हे सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहेत. तीन एप्रिलला रात्रपाळीत त्यांची ड्यूटी होती. बंद साखर कारखाना असलेल्या परिसरात असरा मातेचे एक छोटेसे मंदिर आहे. येथे अंदाजे साडेदहाच्या सुमारास दोन दुचाकींवर दोन जण आल्याचे रखवालदाराने बघितले. दुचाकी या मंदिरासमोर उभ्या दिसल्या. मंदिराच्या परिसरातच तीन फूट लांबी आणि रुंदीचा एक खोल खड्डा खोदलेला असून, तेथे शेजारी टिकास, फावडे व पुजेचे साहित्य दिसून आले. रात्रपाळीत ड्युटीवर असलेल्या रखवालदाराने त्यासंदर्भात आपल्या वरिष्ठ सुरक्षारक्षकांना घटनेची माहिती दिली. दोघेही त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणीसाठी गेले असता, थोड्या वेळानंतर त्यांना दोन्ही दुचाकी दिसल्या नाहीत. मोहंमद शाकीर मोहंमद राजिक यांनी सदर घटनेची तक्रार ही अंजनगावसुर्जी ठाण्यात दाखल केल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुप्तधन शोधण्यासाठी अशी कृती केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. फॉरेन्सिक चमूही दाखल घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या चमूलाही पाचारण करण्यात आले होते. येथील आवश्यक नमुने त्यांनी घेतले असून, घटनेनंतर पोलिसांनी सदर खड्डाही बुजविल्याचे दिसून येते.
चौघा संशयितांची चौकशी
अंजनगावसुर्जी पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्यानंतर चौकशीअंती जनुना येथील तिघांसह अन्य एक, अशा चौघांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते, असे सहायक पोलिस निरीक्षक विनोद धाडसे यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी