चंद्रपूर: धानोरा येथे निशुल्क आरोग्य शिबिराचा दीड हजार जणांनी घेतला लाभ
चंद्रपूर, 06 एप्रिल (हिं.स.)। ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, ही आजच्या काळाची अत्यंत मोठी गरज आहे. शहरांमध्ये वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध असतात. परंतु गावखेड्यातील अनेक कुटुंबांना अजूनही वेळेवर योग्य उपचार मिळत नाहीत. काही
चंद्रपूर: धानोरा येथे निशुल्क भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन; दीड हजार नागरिकांनी घेतला लाभ


चंद्रपूर, 06 एप्रिल (हिं.स.)।

ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, ही आजच्या काळाची अत्यंत मोठी गरज आहे. शहरांमध्ये वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध असतात. परंतु गावखेड्यातील अनेक कुटुंबांना अजूनही वेळेवर योग्य उपचार मिळत नाहीत. काही वेळा आर्थिक अडचणी, तर काही वेळा माहितीचा अभाव यामुळे रुग्ण उपचारापासून वंचित राहतात. त्यामुळे हे आरोग्य शिबिर आयोजित केले असून प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे ही आमची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तसेच भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर तालुका व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत “सर्वरोग निदान व उपचार शिबिर” जिल्हा परिषद शाळा, धानोरा येथे उत्साहात पार पडले. या शिबिरात ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी जवळपास दीड हजार नागरिकांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाला डॉ. अभिषेक जोशी, नानाजी शिंगणे, भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, डॉ. पडगेलवार, नामदेव डाहुले, विजय आगरे, विनोद खेवले आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विशेषतः हायड्रोसिल, हर्निया, गर्भाशयाचे आजार, मोतीबिंदू यांसारख्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. आपण सर्वांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहणे अत्यंत गरजेचे आहे. वेळोवेळी तपासणी करून आजार लवकर ओळखल्यास त्यावर सहज उपचार करता येतात. त्यामुळे अशा शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या शिबिरात मेडिसिन, न्यूरो, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार केले. रुग्णांची नोंदणी, एक्स-रे, रक्त व लघवी तपासणी तसेच औषधोपचार मोफत करण्यात आले. काही गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले असून निवडक शस्त्रक्रियाही मोफत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande