
अमरावती, 06 एप्रिल (हिं.स.)।
अमरावती व मेळघाटातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या जलजीवन मिशन योजनेत १०० कोटींहून अधिकचा मोठा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केला आहे. या प्रकरणाची केंद्रीय समितीमार्फत विशेष चौकशी करावी, अन्यथा राजकारण सोडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.येवले यांच्या म्हणण्यानुसार, “हर घर नल, नल में जल” ही संकल्पना पूर्णपणे अपयशी ठरली असून अनेक गावांत पाणीपुरवठा ठप्प आहे. पाइपलाइन खोदकाम जास्त दाखवून कोट्यवधींची बिले काढण्यात आली, तर अनेक ठिकाणी पाइपलाइन प्रत्यक्षात जमिनीवरच असल्याचा आरोप आहे. जुन्या पाण्याच्या टाक्यांना केवळ रंगरंगोटी करून लाखो रुपयांची बिले काढण्यात आली असून काही ठिकाणी नवीन टाक्यांमध्ये एकदाही पाणी गेलेले नाही.धारणी, चिखलदरा व मेळघाटातील सुमारे ३०-४० गावांमध्ये ८० टक्के पाणीपुरवठा बंद असल्याचा दावा करण्यात आला आहे. ठराविक कंत्राटदारांना कामे देऊन मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी