
अमरावती, 06 एप्रिल (हिं.स.)
खरीप हंगामात पीक विमा योजनेमध्ये जिल्ह्यातील १.८५ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. याच हंगामात अतिवृष्टीमुळे सरासरी पीक उत्पादन घटले. तरीही ६ महिन्यांपासून पीकविमा कंपनीने पीक विम्याचा परतावा दिलेला नसल्याने बाधित शेतकरी संतापले आहेत.
शासनाने एक रुपयात पीकविमा योजना बंद करून योजनेतील महत्त्वाचे चार निकष बाद केले. त्याऐवजी पीक कापणी अहवालावर आधारित विमा व तांत्रिक बेसचा आधार अशी प्रत्येकी ५० टक्क्यांची दोन निकष ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पीक कापणी अहवालातही यंदा उत्पन्न कमी आले आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा आहे. गत वर्षीचा खरीप हंगाम संपल्यानंतर रब्बीचा हंगामही आता संपल्यात जमा झाला आहे. तरीही १ लाख ८५ हजार ५६० शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा कंपनीद्वारे देण्यात आलेला नाही. कृषी विभागाद्वारे पीककापणी अहवाल यापूर्वीच सादर झालेला असताना पीकविमा कंपनीला जाग आलेली नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप शासनाला आहे.खरिपात जास्त पाऊस, अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. पीक कापणी प्रयोगात सरासरी उत्पादन घटले. पैसेवारी देखील ५० च्या आत आहे.३३ टक्क्यांवर नुकसान झाल्याने शासनाने सरसकट मदत दिली, शिवाय अशा परिस्थितीत पीकविम्याचे हेक्टरी किमान १८ हजार शेतकऱ्यांना देण्यात येतील, असे राज्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले आहे. याचा शासनासह कंपनीला विसर पडला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी