
सोलापूर, 06 एप्रिल (हिं.स.)।
हराळवाडी गावात पाणी बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा एक अभिनव प्रयोग सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.गावातील समाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे यांनी ‘हराळवाडी पॅटर्न’ या संकल्पनेतून वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य उपयोग करून एक आदर्श निर्माण केला आहे.ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक बोअरवेलमधून वाया जाणारे पाणी थांबवून त्याचबरोबर धुण्याभांड्याचे सांडपाणी फळझाडांच्या लागवडीसाठी वापरण्यात आले आहे.गावातील मोकळ्या जागेत साचणाऱ्या पाण्याकडे लक्ष देत माऊली हेगडे यांनी तेथील परिसर हिरवागार करण्याचा संकल्प केला.या उपक्रमांतर्गत त्यांनी सुमारे ३५ ते ४० फळझाडांची लागवड केली असून त्यामध्ये केळी,आंबा,चिकू, चेरी,पेरू,रामफळ सफरचंद,फणस,अंजीर,सीताफळ आणि पपई यांसारख्या विविध झाडांचा या लागवडीमध्ये समावेश केला आहे.विशेष म्हणजे ही झाडे पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने जोपासली जात आहेत.आज या झाडांना बहर आला असून गावकऱ्यांना ताजी व नैसर्गिक फळे उपलब्ध होत आहेत.यापूर्वीही सामाजिक कार्यकर्ते माऊली हेगडे यांनी जिल्हा परिषद शाळेत ५३ झाडांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला होता. सध्या ही झाडे मोठी झाली असून विद्यार्थ्यांना सावली आणि स्वच्छ वातावरणाचा लाभ मिळत आहे.या उपक्रमामुळे वाया जाणारे पाणी थांबले असून परिसरातील डासांची उत्पत्ती कमी झाली आहे. परिणामी रोगराईवरही नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. पर्यावरण रक्षण,आरोग्य सुधारणा आणि सामाजिक जागरूकता यांचा संगम असलेला ‘हराळवाडी पॅटर्न’ आता इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. गावातील पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक बोअरवेल मधून हजारो लिटर पाणी वाया जात होते. क्षमतेपेक्षा जास्त पाणी आल्यामुळे गटार देखील तुंबत होती.त्यामुळे डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊन रोगराई आणि घाणेरड्या वासाची समस्या उद्भवत होती. वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग व्हावा म्हणून फळझाडे लावली. नैसर्गिक पद्धतीने फळझाडे मोठी झाली आहेत.ग्रामस्थांना विशेषत लहान मुलांना फळे मिळत आहेत.सहजासहजी कोणीही इतरांच्या शेतामधील झाडांवरील फळे तोडत नाही. परंतु ही सर्व ग्रामस्थांच्याच मालकीची असल्याने लहान मुलांना फळे तोडून खाण्याचा वेगळाच आनंद मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड