नांदेड शहरात वाहतूक नियमभंगाविरोधी कारवाईत अडीच लाख रुपयांचा दंड वसूल
नांदेड, 06 एप्रिल (हिं.स.)। शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर वाहतूक शाखा वजिराबादने विशेष मोहीम राबवत अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना वाहने तसेच अतिक्रमणावर मोठी कारवाई केली. एकाच दिवशीच्या कारवाईत एकूण २४१ प्रकरणे नोंदवून द
नांदेड शहरात वाहतूक नियमभंगाविरोधी कारवाईत अडीच लाख रुपयांचा दंड वसूल


नांदेड, 06 एप्रिल (हिं.स.)। शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर वाहतूक शाखा वजिराबादने विशेष मोहीम राबवत अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना वाहने तसेच अतिक्रमणावर मोठी कारवाई केली. एकाच दिवशीच्या कारवाईत एकूण २४१ प्रकरणे नोंदवून दोन लाख ५४ हजार ५५० रुपयांचा दंड वसूल केला.

शहरात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना वाहने, भरधाव वेग, 'फटाका' बुलेट, वाहन चालवताना मोबाइलचा वापर तसेच रस्त्यावरील अनधिकृत फळगाडे व हातगाडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली. या अनुषंगाने सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे व त्यांच्या पथकाने रेल्वे स्टेशन रोड, महावीर चौक, कलामंदिर, वर्कशॉप, राज कॉर्नर व छत्रपती चौक या प्रमुख ठिकाणी वाहनांची कागदपत्रे तपासली. यावेळी ऑटोचालकांना गणवेश परिधान करण्याबाबत सूचना दिल्या. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने, ट्रिपल सीट प्रवास, विनापरवाना वाहने तसेच रस्त्यावर अतिक्रमण करणारे फळगाडे व हातगाडे यांच्यावरही कारवाई केली. नागरिकांनी वाहने पार्किंगमध्येच उभी करावीत, रस्त्यावर अतिक्रमण करू नये, सिग्नलचे पालन करावे व वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशी कोणतीही कृती टाळावी, अन्यथा मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande