
सोलापूर, 06 एप्रिल (हिं.स.)।
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आलेल्या मोठ्या अपयशानंतर काँग्रेस पक्षामध्ये संघटनात्मक बदल केले जाणार आहेत त्यामध्ये शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोलापुरात दिल्लीहून आलेले निरीक्षक ओरिसाचे माजी आमदार देवशेष पटनायक यांच्यासमोर अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. यामध्ये काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी थेट खासदार प्रणिती शिंदे यांनाच शहराची जबाबदारी द्या त्यांना शहराध्यक्ष करा अशी मागणी निरीक्षकांकडे केली आहे. चाकोते यांनी दिलेल्या निवेदनात सोलापूर काँग्रेस आज केवळ संघटनात्मक अडचणीत नाही, तर अस्तित्वाच्या निर्णायक टप्प्यावर उभी आहे. अशा वेळी फक्त पद भरण्याची औपचारिकता चालणार नाही… तर पक्षाला नवजीवन देणारा, संघर्षातून उभं करणारा आणि जनतेच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण करणारा नेतृत्व हवा!शहराध्यक्ष पदासाठी अनेक इच्छुक आहेत — त्यांची क्षमता आम्ही नाकारत नाही. ब्लॉक, बूथ, वॉर्ड पातळीवर ते सक्षम असतीलही… पण आजची लढाई ही केवळ स्थानिक पातळीवरची नाही — ही काँग्रेसच्या सन्मानाची, अस्तित्वाची आणि भविष्यातील पुनरुत्थानाची लढाई आहे!आणि या लढाईसाठी लागतो तो एक धडाडीचा चेहरा… एक जिद्दी नेतृत्व… एक जनतेच्या हृदयात स्थान असलेला आवाज!तो चेहरा आहे — प्रणिती ताई शिंदे! आज जर सोलापूर काँग्रेसला खरंच नवसंजीवनी द्यायची असेल, तर निर्णयही तितकाच धाडसी घ्यावा लागेल!“प्रणिती ताई शिंदे यांना शहराध्यक्ष करणे ही केवळ योग्य निवड नाही — तर ती सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या पुनरुत्थानाची निर्णायक सुरुवात ठरेल!” असे त्यांनी म्हटले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड