
पुणे, 06 एप्रिल (हिं.स.)।
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पामध्ये एकूण १ हजार ३०५ झाडे बाधित झाली होती. पीएमआरडीएने पर्यावरणपूरक भूमिका घेत यापैकी केवळ ५५७ झाडे तोडली, तर उर्वरित ७४८ झाडांचे सुरक्षितरीत्या पुनर्रोपण केले. तसेच, पर्यावरणाची हानी भरून काढण्यासाठी तब्बल ५,५०० नवीन झाडे लावली. या नव्याने लावलेल्या वृक्षांचे जगण्याचे प्रमाण १०० टक्के असल्याचे दिलासादायक चित्र समोर आले आहे.
ही नवीन झाडे पशुसंवर्धन विभाग, ताथवडे येथील कास्टिंग यार्ड, बावधनचे एनडीए वनक्षेत्र, एनसीएल, पंचवटी, हिंजवडी फेज-३ मधील एमआयडीसी प्लॉट, राजभवन आणि कृषी महाविद्यालय यांसारख्या शहराच्या विविध भागांत लावण्यात आली आहेत. या मोहिमेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला असून, सर्व वृक्षांचे जिओटॅगिंग करण्यात आले आहे. प्रत्येक झाडावर एक ‘क्यूआर कोड’ लावण्यात आला आहे.
नागरिकांनी मोबाइलवरून हा क्यूआर कोड स्कॅन केल्यास, त्यांना संबंधित वृक्षाचे नाव, त्याची प्रजाती आणि त्याचे पर्यावरणातील महत्त्व (फायदे) याबाबतची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध होते. कंत्राटदार आणि ‘सायन्स अँड टेक पार्क’ यांच्या संयुक्त विद्यमाने या सर्व वृक्षांचा सविस्तर डेटाबेस तयार करण्यात आला आहे, अशी माहिती प्राधिकरणाकडून देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु