
बीड, 06 एप्रिल (हिं.स.)।
तालुक्यातील सात्रा येथे जोरदार वादळामुळे शेतकरी रामकिसन बबन हावळे यांच्या शेतात लोखंडी फ्रेममध्ये घट्ट बसवलेले सोलर पंपाचे पॅनल (पाट्या) कागदासारखे उडून गेल्याने त्यांचे मोठे
आर्थिक नुकसान झाले आहे. अचानक सुटलेल्या वादळाचा वेग
इतका प्रचंड होता की, रामकिसन हावळे यांनी शेतात बसवलेल्या सोलर संचाला जोरदार झटका बसला. लोखंडी स्ट्रक्चरवर घट्ट बसवलेले सोलर पॅनल कागदासारख्या हवेत उडून लांब फेकल्या गेल्या. या दुर्घटनेत सोलर पॅनलचे पूर्णतः नुकसान झाले असून, ऐन सिंचनाच्या वेळी सौर पंप बंद पडल्याने शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
मोठ्या आशेने आणि लाखो रुपये खर्च करून बसवलेला हा संच डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्याने हावळे कुटुंबाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शासनाने आणि संबंधित कंपनीने या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी रामकिसन हावळे यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis