
अमरावती, 06 एप्रिल (हिं.स.)
अमरावती येथे मतदार यादीतील ९० टक्क्यांहून अधिक मतदारांचे मॅपिंग पूर्ण करणाऱ्या 'टॉप टेन' ब्लॉक लेव्हल ऑफिसर (बीएलओ) आणि पर्यवेक्षकांचा गौरव करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हा विशेष सन्मान करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी निर्दोष करण्याच्या मोहिमेअंतर्गत ही कामगिरी बजावण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने मतदार यादीचे सखोल पुनरिक्षण करून ती अचूक बनवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सध्याच्या मतदार यादीची २००२ च्या यादीशी जुळवणूक (मॅपिंग) करण्याचे काम सुरू आहे. हे काम ब्लॉक लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांमार्फत केले जात आहे.
अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज आणि उपजिल्हाधिकारी (महसूल) विवेक जाधव यांच्या हस्ते या बीएलओंना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पर्यवेक्षक वसीम फरहत, अविनाश देशमुख आणि जयश्री गजभिये यांचा समावेश होता.तसेच, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी वृषाली मोहोड (९९.७८ टक्के), सारिका काळे (९१.९० टक्के), प्रज्ञा मोकळे (९२ टक्के), अभय मुळे (९१ टक्के), शिवलाल बोरकर (९७ टक्के), वैशाली मोरे (९८.०४ टक्के) आणि हर्षल गिरकुंजे (९५.४२ टक्के) यांचाही गौरव करण्यात आला. या सर्वांनी ९० टक्क्यांहून अधिक मॅपिंगचे काम पूर्ण केले आहे.
या कामगिरीचे कौतुक करताना अप्पर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज आणि उपजिल्हाधिकारी विवेक सोळंके यांनी या बीएलओंच्या कामाला 'रोल मॉडेल' असे संबोधले. क्षेत्र भेटीदरम्यान त्यांनी इतर बीएलओंनाही अशाच प्रकारे उत्कृष्ट काम करून प्रशासनाकडून कौतुकाची थाप मिळवण्याचे आवाहन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी