
अमरावती, 06 एप्रिल (हिं.स.)
अमरावती जिल्ह्यासह राज्यात एप्रिल २०२६ पासून नवीन व वाढीव वाहतूक दंड दर लागू करण्यात आले असून, नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या नव्या दंड दरांमुळे वाहनचालकांना आर्थिक फटका बसणार असला, तरी रस्ते सुरक्षिततेसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.नवीन नियमांनुसार परवाना नसताना वाहन चालवणाऱ्यांवर ५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. नोंदणी प्रमाणपत्र नसल्यास ३,००० ते ५,०००, तर विमा नसल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी २,००० आणि पुनरावृत्ती झाल्यास ४,००० दंडाची तरतूद आहे. हेल्मेट न वापरणे किंवा निकृष्ट हेल्मेट वापरणाऱ्यांवर १,००० दंडासह परवाना निलंबनाची कारवाई होऊ शकते. तसेच सीटबेल्ट न लावणे, दुचाकीवर तिघे प्रवास करणे आणि वाहन चालवताना मोबाईल वापरणे यावरही कडक दंड लागू करण्यात आला आहे.तसेच दारू पिऊन वाहन चालवणे हा गंभीर गुन्हा मानून अशा वाहनचालकांवर १० हजार रुपये दंडासह कारावासाची शिक्षा होणार असून, पुनरावृत्ती झाल्यास दोन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. याशिवाय, रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन वाहनांना अडथळा निर्माण करणाऱ्यांवरही १० हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.दरम्यान, वाढीव दंड दरांबाबत नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. अनेकांच्या मते, केवळ दंड वाढवून वाहतूक समस्या सुटणार नाहीत. शहरातील अनेक ठिकाणी वेगमर्यादा दर्शविणारे फलक नाहीत, रस्त्यांवर योग्य मार्किंग नाही, तसेच खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढत आहे.अपघात झाल्यानंतर तात्काळ मदत मिळण्यात होणारा विलंब, तसेच अपघात तपासणीतील वैज्ञानिक पद्धतींचा अभाव याबाबतही नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या तीव्र हेडलाईट्सवर नियंत्रण नसल्यामुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याचे मत व्यक्त होत आहे. वाहतूक विभागाकडून मात्र या कडक दंडामुळे नागरिकांमध्ये शिस्त निर्माण होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सुरक्षित वाहतुकीसाठी केवळ दंड नव्हे, तर चांगले रस्ते, स्पष्ट फलक, पारदर्शक अंमलबजावणी आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी