
रत्नागिरी, 7 एप्रिल, (हिं. स.) : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गेल्या आर्थिक वर्षात १२८ कोटी ५४ लक्ष इतका महसूल संकलित केला. शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा १०० टक्क्यांहून अधिक महसूल वसुली केली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिली आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने गेल्या आर्थिक वर्षात उच्चांकी १२८ कोटी ५४ लाखाचा महसूल मिळविला. गेल्या वर्षी १०५ कोटी ५० लाखाचा महसूल वसूल झाला होता. यावर्षी त्यात भरघोस वाढ झाली आहे. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतल्याने उद्दिष्टपूर्ती झाली आहे. शंभर टक्क्यांपेक्षा जास्त महसूल वसुली झाल्याने कार्यालयाचे कौतुक होत आहे.
सर्वाधिक महसूल वाहनांच्या नोंदणीतून प्राप्त झाला असून वर्षभरात ३४ हजार ५४० वाहनांची नोंदणी झाली आहे. त्यामध्ये दुचाकी २५ हजार ९०८, चारचाकी ४ हजार ७६१, ऑटोरिक्षा १ हजार ४६१, मालवाहू वाहने २ हजार ५५, प्रवासी वाहने १०७ आणि इतर वाहनांचा समावेश आहे. आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्काद्वारे ३ हजार ५२९ वाहनधारकांकडून ३ कोटी ९४ लाखाचा महसूल मिळाला आहे.
याव्यतिरिक्त कार्यालयाच्या अंमलबजावणी पथकाद्वारे ५ हजार ८१४ दोषी वाहनांवर कारवाई करण्यात आली असून ३ कोटी ३३ लाखाची दंडवसुली करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी