
लातूर, 08 अप्रैल (हिं.स.) : उदगीर शहरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शहराजवळील परिसरात राहणारी पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीकडे गेली होती. याच दरम्यान आरोपी आशिष प्रवीण धोरपड ने संधी साधत तिच्याशी गैरवर्तन केले आणि विनयभंग केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मुलगी घाबरली असली तरी तिने धैर्य दाखवत आरोपीला ढकलून स्वतःची सुटका केली.
घटनेनंतर काही दिवसांनी पीडितेने कुटुंबीयांच्या मदतीने पोलिसांत तक्रार नोंदवली. तिच्या फिर्यादीवरून उदगीर शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक तारू करीत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis