
अकोला, 07 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी संघटनांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत राज्य सरकारने मंत्रालय परिसरात भारतीय कर्मचारी मजदूर युनियनला कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. या मागणीसाठी युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमचंद गोयल यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता.
या संदर्भात 29 मार्च 2026 रोजी नागपूर येथे सफाई कर्मचारी प्रतिनिधी सचिन चावरे यांच्या माध्यमातून राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर निवेदन सादर करण्यात आले होते. यावेळी सचिन चावरे यांनी राज्यातील अनेक कर्मचारी युनियनशी संलग्न असून विविध कामांसाठी त्यांना वारंवार मुंबईला जावे लागते, असे सांगत कर्मचाऱ्यांच्या निवास व मार्गदर्शनासाठी शासनाने सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
बैठकीदरम्यान कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवरही चर्चा करण्यात आली. या मागणीची दखल घेत मंत्री बावनकुळे यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करून मंत्रालय प्रांगणात युनियनच्या कार्यालयासाठी जागा मंजूर केली.
या निर्णयामुळे राज्यातील कर्मचारी वर्गात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, हा निर्णय कर्मचारी संघटनांसाठी एक मोठे यश मानला जात आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे