
आंबेडकर नाट्यगृहासाठी अल्प निधी, केबिन दुरुस्तीसाठी कोटींची तरतूद
अकोला, 07 एप्रिल (हिं.स.) : अकोला महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावरून राजकीय वर्तुळात तीव्र वाद निर्माण झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेल्या खुल्या नाट्यगृहाच्या विकासासाठी केवळ ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचवेळी प्रशासकीय केबिन दुरुस्तीसाठी तब्बल १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याने सत्ताधाऱ्यांच्या प्राधान्यक्रमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
विरोधकांच्या मते, हा निर्णय सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचा अवमान करणारा आहे. गेल्या २५ वर्षांपासून महानगरपालिकेत सत्ता असलेल्या पक्षाने या नाट्यगृहाच्या विकासासाठी ठोस कामे केली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अपवादात्मक काही वर्षे वगळता, उर्वरित काळात विकासकामांची स्पष्ट आकडेवारी सादर करण्यात आलेली नसल्याचेही नमूद करण्यात आले.याउलट, वंचित बहुजन आघाडीच्या महापौर कार्यकाळात ५० लाख रुपये खर्च करून नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात आल्याचे विरोधकांनी सांगितले. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची उदासीनता आणि दिखावूपणा स्पष्ट होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.दलीत वस्ती निधी अंतर्गत काही कामे केली जात असली तरी, स्वखुशीने पुढाकार घेऊन या महत्त्वाच्या सांस्कृतिक स्थळाच्या विकासासाठी कोणतीही ठोस भूमिका घेतली गेली नसल्याची टीकाही करण्यात आली.
दरम्यान, या विषयावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना निलंबित करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला असून, ही कृती लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले जात आहे. जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी आवाज दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर, गेल्या २५ वर्षांतील सविस्तर आकडेवारीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुल्या नाट्यगृहाच्या विकासासाठी नेमकी कोणती कामे करण्यात आली, याचे स्पष्ट आणि लेखी उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे गटनेते निलेश देव, पराग गवई, शेख शमशु शेख साबीर, सौ. उज्वला पातोडे, जयश्री बहादुरकर, सुनील इन्नाणी आदी नगरसेवकांनी केली आहे.
सत्ताधाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवून आपल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी, अशीही ठाम भूमिका विरोधकांनी मांडली आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे