
चंद्रपूर, 07 एप्रिल (हिं.स.) : जिल्ह्यात कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, 2013 (पॉश ॲक्ट) प्रभावीरीत्या अंमलात आणण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळ आणि खाजगी कार्यालयांमध्ये पॉश ऑडिट राबविण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराखाली या उपक्रमासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पॉश ॲक्ट अंतर्गत 10 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक कार्यालयात अंतर्गत समिती स्थापन करणे, समिती फलक लावणे, कर्मचाऱ्यांना कायद्याबाबत प्रशिक्षण देणे, कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि नियमित अहवाल सादर करणे बंधनकारक आहे.
तसेच, संबंधित कार्यालयाच्या नोंदीसह अंतर्गत समितीची माहिती ‘शी बॉक्स’ पोर्टलवर अद्यावत करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याची सखोल पडताळणी पॉश ऑडिटद्वारे केली जाणार आहे.
सहायक आयुक्त, कामगार विभाग, खाजगी कार्यालयांचे नियमित ऑडिटसह पॉश ऑडिट करणार आहेत, आणि त्यानंतरच परवाना नुतनीकरण केले जाईल. तसेच, शिक्षणाधिकारी व म.औ.वि.म. उपअभियंता खाजगी शाळा, उद्योग आणि कारखान्यांचे पॉश ऑडिट करणार आहेत.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी सांगितले की, या कायद्याच्या तरतुदींचे पालन न केल्यास संबंधित कार्यालयावर 50 हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई तसेच आवश्यक कायदेशीर कार्यवाही केली जाईल.
---------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव