
दिंडोरी, 07 एप्रिल, (हिं.स.)। जिल्ह्यातील दिंडोरी पंचायत समितीत थकीत वेतन फरकबिल मंजुरीसाठी ५२ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी, शिक्षक आणि जिल्हा परिषदेतील कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यासह तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) नाशिकच्या पथकाने ही कारवाई ६ मार्च २०२६ रोजी केली. या प्रकरणात गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुकाराम चव्हाण, प्राथमिक शिक्षक नीलेश निंबा भारती आणि जिल्हा परिषद नाशिक येथील कनिष्ठ लेखा अधिकारी देविप्रसाद चैत्राम पाटील यांचा समावेश आहे.
तक्रारदार आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही शिक्षक असून, पेसा क्षेत्रातील नियुक्तीमुळे त्यांना २००२ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीतील थकीत वेतन फरक मिळणे अपेक्षित होते. तक्रारदाराची ६.५७ लाख रुपये, तर त्यांच्या पत्नीची ६.५५ लाख रुपये इतकी रक्कम मंजूर करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्याच्या प्रक्रियेत आरोपींनी लाचेची मागणी केल्याचे समोर आले. चव्हाण यांनी बिल सादर केल्याच्या मोबदल्यात १ टक्के रक्कम घेतल्याचा आरोप आहे. तसेच भारती यांनी सुरुवातीला ५ टक्के आणि नंतर मध्यस्थीने ३ टक्के लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम स्वतःसाठी तसेच जिल्हा परिषदेतिल लेखा अधिकाऱ्याला देण्यासाठी स्वीकारण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. पाटील यांनीही ही रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याचे समोर आले आहेया प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व १२ नुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा कारवाई करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV