अकोला : कवठळ शिवारात पोलिसावरच पोलिसाचा हल्ला
अकोला, 07 एप्रिल (हिं.स.)। गुप्तधन प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच दुसऱ्या पोलिसाकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना ५ एप्रिल रोजी रात्री कवठळ शिवारात घडली. तामगाव पोलीस ठाण्यातील पोलिसावर हल्ला करणारा पोलिस अकोला जिल्ह्यातील उरळ पो
अकोला : कवठळ शिवारात पोलिसावरच पोलिसाचा हल्ला


अकोला, 07 एप्रिल (हिं.स.)। गुप्तधन प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी गेलेल्या पोलिसावरच दुसऱ्या पोलिसाकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना ५ एप्रिल रोजी रात्री कवठळ शिवारात घडली. तामगाव पोलीस ठाण्यातील पोलिसावर हल्ला करणारा पोलिस अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गस्तीवर असलेले पोलिस हवालदार संतोष आखरे व प्रमोद मुळे यांना ५ एप्रिल रोजी रात्री ठाणेदार पंडित सोनवणे यांनी कवठळ शिवारात गुप्तधन काढण्याची माहिती तपासण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दोन्ही पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले; मात्र कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आला नाही. परत येताना राजेश गव्हाळे व मनोज गव्हाळे (पोलीस अमलदार, अकोला जिल्हा) यांच्याशी चौकशीदरम्यान वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी संतोष आखरे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. स्टीलच्या कळ्याने हल्ला करून त्यांच्या पाठीवर व कपाळावर दुखापत केली, तर प्रमोद मुळे यांनाही धमकी देण्यात आली.

मारहाणीची घटना कशी घडली?

गुप्तधनाच्या माहितीवरून तपासासाठी गेलेल्या पोलिसांना परतीच्या मार्गावर आरोपी भेटले. चौकशीदरम्यान वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले.

यांच्यावर करण्यात आली कारवाई

पोलिस हवालदार संतोष आखरे यांच्या फिर्यादीवरून राजेश गव्हाळे व मनोज गव्हाळे यांच्याविरुद्ध भा.न्या. संहितेतील कलम १३२, १२१ (१), ११८ (१), ११५ (२), २९६, ३५१ (२), ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा पुढील तपास सुरू

या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंडितराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, घटनेतील सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत आहे. तसेच संबंधित आरोपींची भूमिका, घटनाक्रम व इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande