
रायगड, 07 एप्रिल (हिं.स.)। माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे पिण्याच्या पाण्याच्या वादातून तणाव निर्माण होऊन मारहाणीची घटना घडली आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास काझीपुरा रोड, मशिद मोहल्ला, गोरेगाव येथे हा प्रकार घडला. फिर्यादी व आरोपी यांच्यात पिण्याच्या पाण्याच्या नळ व मोटरच्या वापराबाबत वाद सुरू होता. या पार्श्वभूमीवर आरोपींनी नळाच्या कनेक्शन दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला बोलावले होते.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने नळाचे कनेक्शन व्यवस्थित असल्याचे सांगून तेथून निघून गेल्यानंतर वाद अधिक चिघळला. त्यानंतर आरोपी क्रमांक १ ते ६ यांनी एकत्र येऊन बेकायदेशीर जमाव जमवला व फिर्यादी तसेच साक्षीदारांवर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशाचेही उल्लंघन झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५६/२०२६ नोंदविण्यात आला असून आरोपींविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम 1951 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रासकर करीत असून परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी दक्षता वाढवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)