
रायगड, 07 एप्रिल, (हिं.स.)। राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह साजरा करण्याचे सक्त आदेश शासनाने दिले आहेत. ८ एप्रिल २०२६ ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत हा सप्ताह राज्यभर राबविण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार, युगपुरुष आणि महान समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करताना लोकशाही, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांवर आधारित राष्ट्राची भक्कम पायाभरणी केली.
भारतीय संविधानातील कलम ४६ नुसार राज्याने दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती यांच्या शैक्षणिक व आर्थिक हितांचे रक्षण करण्याची जबाबदारी घेतली असून सामाजिक अन्याय आणि शोषणापासून त्यांचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
यंदा भारतीय संविधानाला ७५ वर्षे पूर्ण होत असताना देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे. या प्रगतीमागे डॉ. आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महाड येथील महाड चवदार तळे सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठीचा लढा नसून मानवी मूलभूत हक्कांसाठीचा संघर्ष असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले होते.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध योजना व उपक्रमांची माहिती व्हावी, तसेच सामाजिक जागरूकता वाढावी या उद्देशाने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह’ साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
राज्यातील सर्व शासकीय विभागांनी या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून हा आदेश राज्यपालांच्या सहीने पारित करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)