
सोलापूर, 07 एप्रिल (हिं.स.)। प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि अविरत फाऊंडेशन,पुणे यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या विषमुक्त सेंद्रिय शेती प्रकल्पाचे उद्घाटन मकरंद अनासपुरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः पहिले ग्राहक बनून विषमुक्त भाजीपाला विकत घेतला.
उत्तर सोलापूर तालुक्यातील मोरवंची येथील प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून अनाथाश्रम व वृद्धाश्रम चालविण्यात येत असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले, वंचित, अनाथ, निराधार तसेच भिक्षा मागणाऱ्या मुलांचा आणि अनाथ, निराधार, बेघर वृद्ध आजी-आजोबांचा सांभाळ केला जातो. या समाजोपयोगी प्रकल्पाला भेट देण्यासाठी सुप्रसिद्ध व जेष्ठ सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी प्रार्थना फाऊंडेशनला भेट दिली.यावेळी त्यांनी आश्रमातील मुलांशी तसेच वृद्ध आजी-आजोबांशी संवाद साधला.“मुलांनी अभ्यास करावा, कष्ट करावे आणि सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे राहावे,”असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. त्यांच्या या प्रेरणादायी भेटीमुळे आश्रमातील मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की,“आरोग्यदायी जीवनासाठी विषमुक्त अन्न महत्त्वाचे आहे. प्रार्थना फाऊंडेशनच्या या उपक्रमातून तयार होणारा भाजीपाला नागरिकांनी खरेदी करावा आणि विषमुक्त अन्नाच्या दिशेने योग्य पाऊल टाकावे.”या कार्यक्रमाला मोरवंचीचे सरपंच सूर्यभान धोत्रे, शिरापूरचे उपसरपंच सौदागर साठे, अमोल सावंत, प्रार्थना फाऊंडेशनच्या सचिव अनु मोहिते, समाधान वडणे, विष्णू भोसले, शुभम मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.प्रार्थना फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे समाजसेवा आणि आरोग्यदायी शेती यांचा संगम साधला जात असून भविष्यात हा प्रकल्प अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड